राहुरी, (प्रतिनिधी) – तालुक्यातील ताहराबाद येथील कामगार तलाठी अशोक रामचंद्र थोरात यास दहा हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी रंगेहाथ पकडले. बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरणी पकडलेल्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ही लाच स्विकारली गेली. पन्नास हजार रुपये लाचेपैकी चाळीस हजार आधीच स्विकारले होते. राहिलेले दहा हजार लाच घेतांना थोरात याला पकडण्यात आले.
तक्रारदारांच्या मालकीचा ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना तलाठी थोरात याने रविवारी पहाटे पकडले होते. या ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ट्रॅक्टर सोडुन देण्यासाठी तलाठ्याने तक्रारदारांकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. रविवारी 50 हजार रुपयांपैकी 40 हजार रुपये तलाठ्याने स्विकारले. उर्वरित 10 हजार रुपयांची रक्कम आज देण्याचे ठरले होते.त्यानुसार पंचा समक्ष मागणी करुन 10 हजार रुपयांची ताहराबाद तलाठी कार्यालयासमोर स्विकारतांना तलाठी थोरात याला रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पंचासमक्ष ही कारवाई केली. प्रतिबंधक पथकाने पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर हे पथकाचे प्रमुख होते.सहाय्यक अधिकारी श्याम पवरे होते. या पथकात पो.ना. प्रशांत जाधव, विजय गंगुल, राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक हरुन शेख यांचा समावेश होता.