बारामती (प्रतिनिधी) – बारामती तालुक्यातील मोढवे गावाच्या परिसरामध्ये तीन खडी मशिन राजरोसपणे सुरू आहेत. खडी वाहतुकीमुळे मोठ्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यांचे नुकसान झाले आहे. मोठे खड्डे पडलेले आहेत. तेथील स्फोटामुळे घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, खडी मशिनवर कारवाई करा; अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
मोढवे परिसरातील ग्रामस्थांना फटका व त्रास सहन करावा लागत आहे. जमिनी खडी मशीनमध्ये होणाऱ्या धुळीमुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. तेथील स्फोटामुळे घरांना प्रचंड मोठे तडे गेले आहेत. शेतामध्ये काम करताना धुळीमुळे काम करणेही अवघड झाले आहे.
परिसरात सतत स्फोट घडवल्यामुळे त्या परिसरामध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आमच्या जमिनी खराब होते चालल्या आहेत, आम्ही कसे जगायचे, आमचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आम्हाला या त्रासामुळे गाव सोडण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती ग्रामस्थ व शेतकऱ्यांना वाटत आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी विनवणी शेतकरी करीत आहेत.
येत्या 15 दिवसांत बारामती तालुक्यातील मोढवे गावाच्या परिसरातील खडी मशीनवर कारवाई करा; अन्यथा ग्रामस्थांसहित बारामती तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापूराव सोलनकर, माणिकराव काळे, तानाजी कोळेकर, सुहास टकले यांनी दिला आहे.