वाघोली – वाघोलीत दैनंदिन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत ३० मीटर रुंदीचा रस्ता (डी.पी.रोड) खांदवे नगर ते कटकेवाडी प्रस्तावित, खराडी ते बायफ रोड, रायसोनी कालेज प्रस्तावित आहेत. या रस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी वाघोली चे माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी सांगितले की वाघोली शहरातील लोकसंख्या ३ लाखांपेक्षा जास्त असल्याने या भागात दैनंदिन वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. वाघोली शहरातुन पुणे अहमदनगर, संभाजीनगर महामार्ग जात आहे. त्याचबरोबर या महामार्गावर कोरेगांव, सणसवाडी, रांजणगाव, कारेगांव एम.आय.डी.सी. असल्याने दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते.
वाघोली, 60 लोणीकंद, फुलगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात दगड – खाण क्रशर असल्याने वाहतूक जास्त आहे. त्याचबरोबर वाघोली शहरात ५ मोठी महाविद्यालय आहेत तर छोट्या मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्याने देखील खूप वाहतूक कोंडी होते. आपल्या निदर्शनास आणून देण्यात येते की वाघोली शहरासाठी कोणताही बाह्यवळण रस्ता (बायपास) नसल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून दक्षिण बाजूस ३० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित केला आहे. भविष्यातील वाहतूक कोंडीच्या अडचणी सोडविण्यासाठी हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे. तातडीने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.