Nitish Kumar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता दल संयुक्तने मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीत जनता दलाच्या कार्यकारणी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान, जनता दलाचे अध्यक्ष लल्लन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
ललन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांच्यावर पक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदार सोपवण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला सर्वानी पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांची जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार आणि ललन सिंह एकाच गाडीत बसून रवाना झाले होते.
दरम्यान, नितीश कुमार यांची जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘नितीश कुमार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे’ अशाही घोषणा नितीश कुमार यांच्याकडून देण्यात येत होत्या. बिहार सरकारमध्ये मंत्री असणारे विजय कुमार चौधरी याबाबत बोलताना म्हणाले, नितीश कुमार यांनी अध्यक्षपदाची जबाबदार स्वीकारली आहे. ललन सिंह म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री असताना अध्यक्षपद स्वीकारले आहे.
त्यासोबतच नितीश कुमार यांनी जनता दल संयुक्तची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या पक्षातील अधिकारांमध्ये वाढ झाली आहे. जागा वाटप, कोणत्या पक्षाशी युती किंवा आघाडी करायची? आणि उमेदवारांच्या निवडीचे अधिकार नितीश कुमार यांच्याकडे असणार आहेत. आजच्या बैठकीपूर्वी, नितीश कुमार आणि ललन सिंह यांच्यामध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.