मस्कत – फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांत सरस कामगिरी करत बांगलादेशने नवख्या पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाचा तब्बल 84 धावांनी पराभव केला.
फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन याने फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवताना पीएनजी संघाच्या चार प्रमुख फलंदाजांना बाद करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. या विजयाच्या जोरावर बांगलादेशने यंदाच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 गटातील स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या आहेत.
नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार महंमदुल्लाहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महंमद नईम व मुशफिकुर रहिम यांनी निराशा केल्यानंतर शाकिब अल हसन व लिंटन दास यांनी सावध खेळी करत संघाचा डाव सावरला. दास 29 धावांवर अनपेक्षितरीत्या बाद झाला.
शाकिबने 46 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. त्याने आपल्या खेळीत 37 चेंडूत 3 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर आलेल्या महंमदुल्लाहने कर्णधाराची भूमिका जबाबदारीने पार पाडली. त्याने अर्धशतकी खेळी करताना अफिफ हुसेनच्या साथीत संघाला दीडशतकी धावांच्या समीप पोहोचवले.
हुसेन 21 धावांवर परतला. महंमदुल्लाह देखील अर्धशतकानंतर फार काळ टिकू शकला नाही. त्याने 28 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत 50 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर महंमद सैफुद्दीनने 6 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 19 धावांची खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पीएनजी संघाकडून काबुया मोरया, डेमियन राऊ व असद वाला यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना पीएनजीचा डाव अवघ्या 97 धावांवर संपुष्टात आला व बांगलादेशने 84 धावांनी मोठा विजय मिळवला. क्लिपिन डोरियाने 46 तर, हाद सोपरने 11 धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. महंमद सैफुद्दीन व तस्किन अहमद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
बांगलादेशला पहिला सामना गमवावा लागल्यामुळे त्यांना आता केवळ विजय मिळवून चालणार नाही तर, त्यांना नेट रनरेटही वाढवावा लागणार आहे. गेल्या महिन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांना पराभूत करत मालिका जिंकत इतिहास घडवला होता. मात्र, या स्पर्धेत त्यांना पहिल्या सामन्यात तसाच सरस खेळ करण्यात अपयश आले होते.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश – 20 षटकांत 7 बाद 181 धावा. (महंमदुल्लाह 50, शाकिब अल हसन 46, लिंटन दास 29, अफिफ हुसेन 21, काबुया मोरया 2-26, असद वाला 2-26, डेमियन राऊ 2-40).
पापुआ न्यू गिनी – 19.3 षटकांत सर्वबाद 97 धावा. (क्लिपिन डोरिया 46, हाद सोपर 11, शाकिब अल हसन 4-9, तस्किन अहमद 2-12, महंमद सैफुद्दीन 2-21).