दुबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधित होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीने तिकिट मिळवू न शकलेल्या चाहत्यांसाठी अभिनव योजना जाहीर केली आहे. आयसीसीने या स्पर्धेचे सामने होत असलेल्या सर्व मैदानांवर उभे राहुन सामना पाहण्याची तयारी असलेल्यांसाठी स्टॅण्डइन तिकिटे उपलब्ध केली आहेत.
या स्पर्धेचे सामने ज्या मैदानांवर होणार आहेत, त्यांची किमान क्षमता 45 ते 90 हजार इतकी आहे. त्याबरोबरच 4 हजार तिकिटे उभे राहून सामना पाहणाऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. या तिकिटाचा जर प्रत्येकी 30 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 1670 भारतीय रुपये आहे.
यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.
दरम्यान, भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील क्रिकेटचा सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत याच दोन देशांतील सामन्याची तिकिटे तब्बल तीन महिने आधीच संपली आहेत.