सिंगापूर – रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध कडक होण्याची शक्यता असतानाच ओपीईसी ही तेल उत्पादकाची संघटना आगामी काळात उत्पादन कमी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढून 100 डॉलर पेक्षा जास्त झाल्या.
अमेरिकेतील काही तेल शुद्धीकरण कारखाने बंद राहणार असल्याच्या शक्यतेमुळेही तेलाच्या किमतीवर गुरुवारी परिणाम झाला असल्याचे दिसून आले. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्र्यांनी परवा तेलाच्या किमती घसरू नये यासाठी तेलाचे उत्पादन कमी करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ओपीईसी म्हणजे तेल उत्पादक देशाची संघटना या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेणार आहे.
त्याचबरोबर इराणच्या अणू कार्यक्रमावर इराण आणि इतर देशा दरम्यान चर्चा होणार आहे. त्यामुळे इराणकडून तेलाचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता नाही. मात्र जर अमेरिका, युरोपियन समुदाय आणि इराणदरम्यानची चर्चा यशस्वी झाले तर जागतिक बाजारात इराणचे प्रत्येक दिवसाला दहा लाख पिंप तेल उपलब्ध होण्याची शक्यता खुली होईल.
मात्र रशियाकडून तेल पुरवठा होत नसल्यामुळे याचा जागतिक तेल बाजारावर फारसा सकारात्मक परिणाम जाणवणार नाही. दरम्यान अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील एका तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये झालेल्या अपघातानंतर हा प्रकल्प काही दिवस बंद होणार आहे. त्यामुळे जागतिक तेल उत्पादनावर परिणाम जाणवणार आहे.