बारामती/जळोची – व्याजाने घेतलेल्या 40 हजार रुपयांच्या बदल्यात 1 लाख 27 हजार रुपयांची रक्कम आणि 39 हजार रुपयांचा किराणा नेल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करणाऱ्या अवैध सावकाराने त्याच्या सहकाऱ्यांसह व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली.
या प्रकरणी सावकारासह त्याच्या साथीदारांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुंडलिक काळे, त्यांचा मुलगा अक्षय काळे (रा. नीरावागज, ता. बारामती) व अन्य तिघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली.
शहरातील आंबेडकर स्टेडियमजवळ अभिजित पुष्कराज टाटीया यांचा छोट्याशा गाळ्यात किराणा मालाचा व्यवसाय आहे. 2018साली त्यांना व्यवसायासाठी निरावागज गावात राहणारे खासगी सावकार कुंडलिक काळे यांच्याकडून 40 हजार रुपये महिना पाच टक्के व्याजाने घेतले. तारणापोटी बारामती सहकारी बॅंकेचा धनादेश देण्यात आला. टाटिया हे तेव्हापासून दर महिन्याला वेळोवेळी व्याज देत आले. आजवर 1 लाख 27 हजार रुपये देण्यात आले.
याशिवाय दुकानातून आजवर 39 हजार रुपयांचा किराणा माल नेला. बुधवारी (दि. 24) कुंडलिक काळे यांनी टाटिया यांच्या दुकानात येत दोन महिन्यांचे दहा हजार रुपये व्याज द्या, अशी मागणी केली. मुद्दल, व्याज फिटले असल्याचे टाटिया यांनी सांगितले. त्यावर कुंडलिक याने त्यांचा मुलगा अक्षयला फोन करुन बोलावले. अक्षय हा अन्य तिघांना घेऊन आला. त्यांनी अभिजित व पुष्कराज यांना कुटुंबीयांसमोर दुकानात मारहाण केली.