पुणे- अनधिकृत बांधकामांमधील सदनिका तसेच तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्तनोंदणी करणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमबाह्यपणे 10 हजार 561 दस्त नोंदविल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात 11 दुय्यम निबंधकांसह एकूण 44 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, तपासणी पथकाने शहरातील कार्यालयांची तपासणी करताना देखील भेदभाव केला. चार ते पाच कार्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक मदत केल्याची कुजबूज दबक्या आवाजात नोंदणी व मुद्रांक विभागात सुरू आहे.
|
नियमबाह्यपणे दस्तांची नोंदणी करण्यात येत असल्याची तक्रार मंत्रालयापर्यंत गेल्याने महसूल विभागाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील मागील तीन वर्षांतील दस्तांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने तपासणी पथके स्थापन केली. या पथकाने शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये जाऊन दस्तांची तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम प्रकल्पातील सदनिका अथवा दुकाने यांची नोंदणी करतेवेळी दस्तामध्ये “रेरा’ क्रमांक नमुद आहे का, बांधकाम प्रकल्पाला मंजुरी आहे का, यासह जमिनीचे तुकडे करून विक्री केली आहे का, याची तपासणी केली. यामध्ये तब्बल 10 हजार 561 नियमबाह्य नोंदविल्याचे आढळल्यानंतर 44 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, तपासणी पथकाने काही कार्यालयातील तपासणी करताना दुजाभाव केल्याची चर्चा सध्या नोंदणी विभागात सुरू आहे.