पुणे – पुणे महापालिकेचा वीज खर्च 2021-22 मध्ये तब्बल 270 कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे वीज बचतीसाठी महापालिकेकडून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) या सहयोगी कंपनी सोबत ऊर्जेची व उर्जा खर्चाची बचत, धोरण, यासाठी उपाययोजना करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
महाप्रितने सुचविलेल्या सुधारणांमधून कमीत कमी 15 टक्के वीज बचत होणे अपेक्षित असून या बचतीच्या हिश्श्यातील 80 टक्के रक्कम महाप्रितला तर 20 टक्के रक्कम महापालिकेस मिळणार आहे. या सामंजस्य करारावर महाप्रितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कुंदल, अधिक्षक अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम पाटील, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, मुख्य महाव्यवस्थापक श्यामसुंदर सोनी, सतीश चवरे, गणेश चौधरी, विरेंद्र जाधवराव, पंकज शहा, प्रसाद दहापुते आणि जनसंपर्क अधिकारी मिलिंद अवताडे उपस्थित होते.
यावर होतो खर्च…
महापालिकेचा वीज खर्च 2021-22 अखेर 250 कोटींच्या घरात गेला आहे. महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्र आणि वितरण यंत्रणेसाठी तब्बल 150 कोटींचा वार्षिक वीज खर्च आहे. तर 55 कोटींचा खर्च मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी लागतो. पथदिव्यांसाठी 45 कोटी तर जवळपास 20 कोटींचा खर्च महापालिकेच्या इमारती, दवाखाने, स्मशानभूमी, नाट्यगृहे, पालिकेची कार्यालये यासाठी लागतो. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज वापर होतो, अशा ठिकाणी वीज बचतीच्या उपाय योजनांचा आराखडा “महाप्रित’ करणार असून पालिकेसाठी जास्तीत जास्त सौरऊर्जा वापराबाबतही त्यांच्याकडून आराखडा दिला जाणार आहे.