जळगाव – माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील जामनेर येथे सुरु केलेल्या रुग्णालयाचा उदघाटन सोहळा येत्या मंगळवारी पार पडणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ खडसे व देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर दिसणार काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.
अशातच आता खुद्द एकनाथ खडसेंनी याबाबत प्रतिक्रिया देताना हा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना खडसे यांनी, ‘फडणवीस यांच्या सोबत उपस्थित राहायचे की नाही याबाबत उत्सुकता राहू द्या, आत्ताच सगळे सांगून कसे चालेल,’ असं वक्तव्य केलं.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे असलेले खडसे काल (शनिवारी) रात्री उशिरा जळगाव येथे पोहचले. यानंतर त्यांनी आज (रविवारी) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. खडसे मुंबई येथे गेले असता ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अशी कोणतीही भेट झाली नाही. माध्यम प्रतिनिधींनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारले असता खडसेंनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
तत्पूर्वी, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देखील एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरबाबत, ‘खडसे कोणाच्या संपर्कात आहेत हे माहीत नाही, मात्र ते पक्षांतर करणार आहेत हे सत्य आहे.’ असं महत्वपूर्ण वक्तव्य केलं. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर खडसे नेमकं मनगटावर घड्याळ बांधणार की शिवबंधन याबाबतच्या चर्चा नव्याने सुरु झाल्या आहेत.