- फळे, भाजीपाला विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण
पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सर्वत्र प्रशस्त रस्ते तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ उभारण्यात आले आहेत. परंतु पदपथांवर भाजीपाला, हातगाडीवाले, फळविक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच स्थानिक व्यावसायिकांनी देखील पदपथ बळकविले आहेत. तसेच वाहनचालक आपली वाहने रस्त्यातच बेशिस्तपणे पार्क करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
दापोडी येथील शितोळे पेट्रोल पंपापासून फुगेवाडीच्या दिशेने जाताना येथे भाजीविक्री, फळविक्री करणाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच व्यावसायिक दुकाने रस्त्याच्या लगत असल्याने नागरिक खरेदीसाठी जाताना आपली वाहने पार्किंगची व्यवस्था जेथे आहे तेथे पार्क न करता रस्त्यातच लावत आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कॉर्पोरेशन बॅंकेसमोरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पदपथावर फळविक्रेते विक्री करीत असलेल्या हातगाड्यांसमोर वाहने पार्क करीत आहेत. तसेच पदथावर पार्किंग केलेल्या दुचाकींच्या पाठीमागे देखील दुचाकी वाहने बेशिस्तपणे पार्क केल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भर चौकातून फुगेवाडीच्या दिशेने जाताना रस्त्याच्या कडेला फळविक्रेत्यांमुळे तसेच एका पाठोपाठ एक वाहने पार्क केल्यामुळे पायी चालणारे नागरिकांना तसेच वाहन चालविणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या चौकातून पिंपळे गुरव, फुगेवाडी, दापोडी गाव, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप या सर्व बाजूंनी वाहतुकीची वर्दळ सुरू असते. अनेकदा अशा कोंडीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. संबंधित वाहतूक प्रशासनाने याकडे डोळे झाक न करता वेळीच बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर तसेच फळविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पादचाऱ्यांना अपघाताचा धोका
पदपथांवर अतिक्रमण केल्याने नागरिकांना, पादचाऱ्यांना मुख्य रहदारीच्या रस्त्याचा वापर ये-जा करण्यासाठी करावा लागत आहे. त्यामुळे वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना रस्त्याने ये-जा करताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.