- “करोना’चा परिणाम ः अवघ्या दीड वर्षांवर महापालिका निवडणूक
पिंपरी – मार्च महिन्यांपासून प्रत्येक सण आणि उत्सवावर “करोना’ने विरजण घातले. त्याचप्रमाणे आता नवरात्रौत्सवावर देखील “करोना’चे संकट आहे. नवरात्रीत शहरात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. विशेषतः राजकारणी मंडळी या नऊ दिवसांचा आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी उपयोग करुन घेत असतात. परंतु यंदा नगरसेवक व इच्छुकांना ही संधी गमावावी लागणार आहे.
येत्या 17 ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव सुरू होणार असल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे हा सण साजरा करण्यावर बंधने असल्याने महापालिका निवडणुकीची तयारी करणारे इच्छुक व नगरसेवकांना यंदा नवरात्रीचा इव्हेंट भरविता करता येणार नाही. त्यामुळे जाहिरातबाजीची नामी संधीला हे सर्व जण मुकणार आहेत. अवघ्या दीड वर्षांवर महापालिका निवडणूक येऊन ठेपली असल्याने जनसंपर्क आणि “इमेज बिल्डींग’साठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी करोना आटोक्यात न येणे हा एक मोठा झटका आहे.
सध्या नागरिकांना दसरा-दिवाळीचे वेध लागले आहेत. मात्र, सात महिन्यांपासून शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवाच्या आयोजनावर पाणी पडले आहे. शहराच्या विविध भागांत नवरात्रीची धूम असते.
निवडणुकीच्यादृष्टीने असे इव्हेंट इच्छुकांसाठी महत्वाचे मानले जातात. नवरात्रौत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून तसेच सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींनादेखील बक्षिस दिले जात असल्याने शेकडो नागरिकांशी संवाद साधण्यासाठी नवरात्रौत्सव महत्वाचा मानला जातो.
जनसंपर्काचे प्रयत्न
महाआघाडी सरकारचा चार सदस्य प्रभाग पद्धतीला विरोध असून, महापालिका निवडणुकीसाठी द्विसदस्यीय वॉर्ड पद्धतीचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे. त्यानुसार महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, अनेक नगरसेवक व इच्छुकांची तयारी सुरु झाली आहे. करोना अथवा अन्य कारणामुळे हे इच्छुक आपल्या संभाव्य वॉर्डातील नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याकरिता सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. राजकारणी व इच्छुकांची या इव्हेंटसाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असताना सर्वांना करोनाच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने नवरात्रौत्सवाचे आयोजन करणे शक्य होता येणार नाही.
आरोग्यविषयक उपक्रमांवर भर
सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही. देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. मंडपात थर्मल स्क्रीनिंग, निर्जंतुकीकरणाची व्यवस्था असावी. तसेच मंडपात एकावेळी पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नसावेत. त्याऐवजी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करावे, असे सुचविण्यात आले आहे.