मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआय अधिकारी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई येथे दाखल झाले आहेत. अशातच आज सीबीआयतर्फे सुशांत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांतील दोन अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सध्या सीबीआयतर्फे कसून चौकशी करण्यात येत असून मुंबईतील एका गेस्ट हाऊसमध्ये संबंधितांना चौकशीसाठी बोलावलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार समन्स बजावण्यात आलेल्या मुंबई पोलिसांतील दोन्ही अधिकाऱ्यांना देखील याच गेस्ट हाऊसवर बोलविण्यात आलं आहे.
सीबीआयतर्फे बजावण्यात आलेल्या समन्समध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयतर्फे समन्स बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्यावर रुग्णालयामध्ये कोरोना उपचार सुरु आहेत. तर दुसरा अधिकारी सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे अशी माहिती सुत्रांकरवी मिळाली आहे.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयातर्फे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय देण्यात आला होता. यानंतर शुक्रवारपासून सीबीआयची एक तुकडी मुंबईमध्ये दाखल झाली आहे.
सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या मृत्यूस त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. असं असलं तरी सीबीआयतर्फे अद्याप रिया चक्रवर्ती अथवा सुशांतच्या मित्रांना चौकशीसाठी बोलविण्यात आलेले नाही.