मंचर -अवसरी खुर्द (ता. आंबेगोव) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने मंगळवारी (दि. 25) आठ जणांना चावा घेऊन जखमी केले. जखमींनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अवसरी खुर्द गावठाण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने देऊबाई गेनभाऊ शिंदे (वय 75), आर्फिन मोहम्मद अली अन्सारी (वय 4), शिवनाथ नानाभाऊ शिंदे (वय 55), प्रकाश गुरव (वय 60), भीमाजी धर्माजी शिंदे (वय 65), रजत कराळे (वय 8), रुपेश घाटकर (वय 30), नीलेश यादव (वय 35) अशा आठ जणांना चावा घेतला.
याबरोबरच दहा ते पंधरा मोकाट कुत्र्यांनाही या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला; परंतु ते शासकीय विद्यालयाच्या बाजूला पळून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.