नवी दिल्ली – पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित श्रीराम मंदिराचे उद्घाटन मोठ्या दिमाखात केले जाणार असल्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. या निमित्ताने संपूर्ण अयोध्येमध्ये राम मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर सूर्यस्तंभ उभारण्यात येणार आहेत. हे सूर्यस्तंभ म्हणजे सौर उर्जेवर प्रज्वलितहोणारे दिवे असणार आहेत. यातील प्रत्येक स्तंभ ३० फूट उंचीचा असणार आहे. रात्रीच्या वेळी प्रदीप्त झाल्यावर सूर्याचा आभास निर्माण होणार आहे.
अयोध्या बायपासला नया घाटाजवळील लता मंगेशकर चौकाला जोडणाऱ्या धरम पथ या रस्त्यावर असे ४० खांब बसवले जातील, असे उत्तर प्रदेशच्या अयोध्या विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. .
हे सूर्यस्तंभ उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या स्तंभांपैकी लता मंगेशकर चौकामध्ये एका बाजूला १० याप्रमाणे २० स्तंभ असणार आहेत. यामुळे संपूर्ण सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याचे समजते.
हे कलाकार देखील लावणार सोहळ्याला हजेरी
सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, रिषभ शेट्टी आदींना निमंत्रण पाठवण्यात आल्याचे वृत्त याआधी होते. आता ऐतिहासिक ठरणाऱ्या सोहळ्यासाठी इतरही अनेक कलाकारांना निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. त्यामध्ये प्रामुख्याने सनी देओल, अजय देवगण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रभास, यश, टायगर श्रॉफ, आयषुमान खुराणा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.