पुणे – आगामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पोलिसांनी आचरसंहिता जारी केली आहे. महापालिकेने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे सर्वांचे एकमत झाले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाने आचारसंहिता जाहीर केली आहे. यात गर्दी टाळण्यापासून सुरक्षेसंबंधी अन्य उपायायोजना बंधनकारक आहेत.
प्रतिष्ठापना आणि दर्शन
गणेश मूर्ती खरेदी मंडळांनी व नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने करावी. श्रींचे आगमन व विसर्जनाच्या वेळी कमीकमी लोक एकत्र जमतील. मिरवणुका काढू नयेत. ज्या मंडळांची मंदिरे आहेत, त्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी. श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन करावी. ऑनलाइन टोकन, डिजिटल पास सुविधा देताना वेळेची मर्यादा ठेवावी. फुले, मिठाई आदींचे स्टॉल लावण्यास मनाई आहे. रुग्णवाहिका, रिक्षा व इतर वाहने जाण्यासाठी मोकळी जागा ठेवावी. सॅनिटायझेशनसाठी विविध साधने मंडळांनी ठेवावीत.
सुरक्षा
– संशयित किंवा बेवारस वस्तू आढळल्यास ताबडतोब पोलिसांना माहिती द्यावी. श्रींच्या मूर्तीस दागिने असणाऱ्या मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी.
– श्रीच्या मूर्ती रक्षणासाठी कमीतकमी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक 24 तास हजर असावेत.
श्री विसर्जन
श्रींचे विसर्जन मंडळालगतच विधिवत करावे. मिरवणूक काढता येणार नाही. महापालिका विसर्जन घाट व हौदांची व्यवस्था करणार नाही. अन्नदान आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांना गर्दीस मनाई आहे. आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. गणेश मूर्ती आणि निर्माल्य महापालिकेने नेण्याची व्यवस्था केली आहे.
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना
करोना संक्रमण टाळण्यासाठी शासन निर्देशांचे पालन करावे. व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क यावा, याची खबरदारी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रांतील मंडळांनी अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेश मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी आरोग्य सेतू ऍप वापरणे बंधनकारक आहे, असे पोलिसांनी या आदेशात म्हटले आहे.
पोलीस मदतीसाठी संपर्क क्रमांक
नियंत्रण कक्ष – 100/ 020-26126296/ 26122880
वाहतूक नियंत्रण कक्ष – 020-26685000
विशेष शाखा नियंत्रण कक्ष – 020-26208286