पुणे – महापालिकेने शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची (कंटेन्मेंट झोन) फेरचना केली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर घोषित केलेल्या 75 प्रतिबंधित क्षेत्रांमधून 9 क्षेत्र कमी झाले असून आता शहरात एकूण 66 प्रतिबंधित क्षेत्र राहिली आहेत. ही माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री दिली.
पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत या प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली. हे क्षेत्र मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंत संक्रमणशील क्षेत्र म्हणून कायम राहतील. प्रतिबंधित क्षेत्र आणि क्षेत्राबाहेर विशिष्ट क्षेत्र, गल्ली, चाळ, वसाहत, विशिष्ट इमारती, गृहनिर्माण येथे करोना
बाधितांची संख्या 5 आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे अधिकारी तेथील क्षेत्र लगेच सील करतील. नवीन प्रतिबंधित क्षेत्रामधील आवश्यक त्या ठिकाणी येण्याचे आणि जाण्याचे मार्ग हे संबंधित भागातील पोलीस अधिकारी क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अडथळे उभे करतील. तसेच जो भाग आता प्रतिबंधित क्षेत्र राहिलेला नाही, अशा ठिकाणी ठेवलेले अडथळे काढून टाकण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.