पृथ्वीराज चव्हाण यांचे रेठरे बुद्रुक येथील सभेत आवाहन
कराड – स्वतःच्या गावच्या विकासाबद्दल तुम्हाला अजिबात चिंता नाही. आणि तिसऱ्यांदा तुम्ही उभे राहिला आहात. परंतु जनता तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. यशवंतराव मोहिते यांनी कृष्णा कारखाना व सर्व संस्थांची स्थापना केली. दुर्दैवाने आज ज्यांच्याकडे ही समाजाच्या विकासाची सहकार मंदिरे आहेत. त्यांचे पावित्र्य जपण्याऐवजी ते नष्ट करण्याचे काम विरोधकांनी केले आहे.
या मंडळींना निवडून दिल्यास उद्या कराडसुद्धा ते विकतील. ही परिस्थिती बदलण्यासाठी आघाडीला पाठबळ द्या, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते, जयवंतराव जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर, उत्तमराव मोहिते, मदनराव मोहिते, कृष्णत चव्हाण-पाटील, दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी माझ्याकडे आमदार निधीतून विकास कामांसाठी ग्रामपंचायतीकडून लेखी मागणीद्वारे ठराव मागितले होते. ते ठराव देण्यासाठी ग्रामपंचायतीने लेखीस्वरूपी नकार दिला आहे. याबाबत संबंधित ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. अधिकाऱ्यांनी आदेश करूनही जावपूर्वक ठराव दिलेला नसल्याचे कागदोपत्री पुरावे हातात घेवून आ. चव्हाण यांनी सत्ताधारी भोसले गटावर नाव न घेता शरसंधान साधले. नितीन पाटील यांनी बार असोसिएशन कॉंग्रेसच्या पाठिशी ठाम असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट केली.