आंद्रा, भामा आसखेडमुळे पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार

महापौर जाधव यांचा विश्‍वास

पिंपरी – तत्कालीन राजकर्त्यांकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे पिंपरी चिंचवडसाठी आंद्रा भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करुन देण्याची योजना केवळ कागदावर राहिली होती. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना ठरेल, असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी येथे केले. रेडझोनचा प्रश्‍न सोडविण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना निश्‍चित यश मिळेल, असा विश्‍वासही महापौरांनी व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ त्रिवेणीनगर, तळवडे, रुपीनगर भागात कॉर्नरसभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महापौर जाधव बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, भाजप महिला आघाडीच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, अरुणा भालेकर, गोपाळ भालेकर, शरद वसंत भालेकर, एस. डी. भालेकर आदी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, पिंपरी-चिंचवड हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. इतर शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडच्या लोकसंख्या वाढीचा दर दुप्पट आहे. सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेता पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावत या योजनेस गती देण्यात आली आहे.

प्रस्तावित योजनेनुसार मावळ आणि खेड तालुक्‍यातील या दोन धरणांमधून पिंपरी चिंचवडसाठी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला होता. मात्र, तत्कालीन राजकर्त्यांच्या उदासीनतेमुळे पुन:स्थापना खर्च भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना अनेक वर्षांपासून हक्काच्या पाण्यापासून वंचित व्हावे लागले होते. मात्र, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)