अजित पवार : महायुतीला रोखण्यासाठी निर्णय
पिंपरी – लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जंग-जंग पछाडले होते, तेच पार्थ पवार विधासभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारासाठी आणि पुरस्कृत उमेदवारांसाठी प्रचार करणार नसल्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
शहरातील तीनपैकी दोन मतदार संघांमध्ये उमेदवार सुद्धा देऊ न शकलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने चिंचवड आणि भोसरी मतदारासंघात अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने, डब्बू आसवानी, नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक योगेश बहल, वैशाली काळभोर, राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, पिंपरी, चिंचवड, भोसरी शहरात अराजकता वाढलेली आहे. भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे असून गुन्हेगारी रोखणे काळाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीतर्फे चिंचवडमधून राहुल कलाटे, भोसरीत विलास लांडे पुरस्कृत केले आहे. तर पिंपरीत राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे निवडणूक लढवित आहेत.
पवार म्हणाले की, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात भ्रष्टाचार वाढला आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढून महिला-मुलीही सुरक्षित नाहीत. पोलीस आयुक्तालय होऊनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. चिंचवड आणि भोसरीच्या विकासासाठी आम्ही अपक्ष उमदेवारांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीच्या उमेदवारांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
“पार्थ’ प्रचारापासून दूर
लढण्यापूर्वीच तीनपैकी दोन मतदार संघ गमावून बसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता अपक्षांना पाठिंबा दिला आहे. पक्षाची वाताहत होत असताना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अजूनही शहराकडे लक्ष देताना दिसत नाही. ज्या पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक केले होते. आता तेच पार्थ पवार प्रचारासाठी येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जर अशीच विधानसभा लढवायची होती, तर मुलाखती, इच्छुकांचे अर्ज, वेगवेगळी आंदोलने करण्याची उठाठेव, का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.