“इलेक्‍शन ड्यूटी’साठी सातव्या आयोगानुसार भत्ता

पिंपरी – निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीसाठी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनानुसार 50 टक्के भत्ता देण्यात येणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे तसा अध्यादेश जारी केला आहे.

मतदान व मतमोजणीच्या कामासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या साऱ्यांना निवडणूक भत्ता देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 18 मार्च 2014 रोजी अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार निवडणूक कामासाठी हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना भत्ते देण्यात येणार आहेत. असा भत्ता केव्हा देण्यात यावा ?, याचेही निकष ठरविण्यात आले आहेत. प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्यांना हा भत्ता दिला जाणार आहे.

मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष कर्तव्य बजावणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देय राहणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना भत्त्याचे वाटप करणाऱ्या व यासंबंधी वेतन पावती नोंदवहीचे काम पाहणाऱ्या लेखा कर्मचाऱ्यांना देखील मतदान अधिकाऱ्यांइतका भत्ता लागू राहणार आहे. कर्मचाऱ्यांना भोजनाची पाकिटे किंवा सौम्य अल्पोपहार प्रतिदिन 150 रुपयांच्या मर्यादेत पुरविण्यात येणार आहे. अल्पोपहार पाकिटे पुरविणे शक्‍य न झाल्यास हा भत्ता रोखीने देण्यात येणार आहे.

बंदोबस्त कर्मचाऱ्यांनाही भत्ता

बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, मोबाईल पथके, होमगार्ड, ग्रामरक्षक दल, वनरक्षक दल, एनसीसी कॅडेटस, माजी सैनिक अधिकारी व केंद्रीय निम्नलष्करी दलातील जवानांना आहार भत्ता रोखीने अदा करण्यात येणार आहे किंवा भोजन पाकिटाची व्यवस्था केली जाणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष व निरीक्षकांना देण्यात येणाऱ्या भत्त्याइतका भत्ता असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.