दिवाळी आधीच 24 ऑक्टोबरला होणार पगार
मुंबई : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली असतानाच राज्य सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्ययांना खूशखबर दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर सरकारने कर्मचाऱ्यांना आठ दिवस अगोदर म्हणजेच 24 ऑक्टोबर पगार देण्याचे निर्देश दिले आहेत. पेन्शनधारकांबरोबरच सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहिन्याच्या 1 तारखेला पगार दिला जातो. परंतु, यंदा दिवाळी महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 25 तारखेला आहे. दिवाळी दरम्यानच विधानसभा निवडणूकीसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी नको तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना आठ दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वीही सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अनेक शाळा, कार्यालयांकडून सरकारचे आदेश धाब्यावर बसविले जातात.
दिवळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने पाच टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी आता राज्य सरकारलाही करावी लागणार आहे. यासाठी सरकारी कर्मचारी संघटनाही आग्रही असून नोव्हेंबरच्या पगारात ही महागाई भत्तावाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.