– सुचित्रा दिवाकर
शॉर्ट व्हिडिओच्या वाढत्या प्रस्थामुळे केवळ टेस्क्ट नाही तर फोटोच्या लोकप्रियतेवरही काही अंशी घाला घातला गेला आहे. 2023 मध्ये सोशल मीडियावर यूजर दररोज सरासरी 145 मिनिटांपर्यंत वेळ घालवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
गेल्या आठवड्यात एक बातमी होती आणि ती म्हणजे युट्यूबचे शॉर्टस् म्हणजेच लहानसहान व्हिडिओमुळे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस्चे बिझनेस मॉडेल अडचणीत आले आहे. याचा अनुभव आपल्यालाही आला असेल. दुकानात जा, रिक्षातून जा, बसमधून जा, मोठ्या मॉलमध्ये जा, प्रवासात जा अनेक ठिकाणी बहुतांश मंडळी मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली दिसतात. नुसते सोशल मीडियाच नाही तर त्यावरचे व्हायरल होणारे व्हिडिओ, रील्समुळे ही गडबड होत आहे.
वाढत्या लोकप्रियतेमुळेच यूजर आता दीर्घकाळ चालणाऱ्या व्हिडिओऐवजी कमी काळाच्या व्हिडिओला प्राधान्य देत आहेत. 2023 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात तयार होणाऱ्या लहान व्हिडिओंनी युट्यूबच्या झोळीत अन्य सोशल मीडिया संकेतस्थळाच्या तुलनेत अधिक पैसे टाकले आहेत. “इन्स्टाग्राम’, “फेसबुक’, “एक्स’सारख्या अन्य प्लॅटफॉर्मवरही वेगवेगळ्या नावाने हजेरी लावणाऱ्या शॉर्ट व्हिडिओने त्यांच्याही व्यवसायाचे स्वरूपही बदलले आहे.
वास्तविक सोशल मीडियावर फोटो, जीफ देखील भरपूर आहेत. एवढेच नाही तर दीर्घकाळ व्हिडिओ तयार करणारे ब्लॉगर्स देखील आहेत. परंतु त्यावर मात केली लहानसहान व्हिडिओ तयार करणाऱ्या मंडळींनी. जगभरात सर्वाधिक लहान व्हिडिओ एमएक्स शॉर्ट व्हिडिओ, मौज, जोश, चिंगारी, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड होत आहेत. टिकटॉक देखील आहे, परंतु भारतात त्यावर बंदी आहे. मध्यंतरीच्या काळात भारतात टिकटॉकने कळस गाठला होता. जगभरात सुमारे 5.44 अब्ज सक्रिय इंटरनेट यूजर आहेत. “फोर्ब्स’च्या मते, यापैकी 4.9 अब्ज लोक सोशल मीडियावर सक्रिय असून कालांतराने ही संख्या 2027 पर्यंत 5.85 अब्जावर पोचण्याची आशा आहे.
“सोशल इनसायडर’च्या मते, इन्स्टाग्राम, युट्यूब किंवा फेसबुकवर अपलोड करण्यात येणारे शॉर्ट व्हिडिओ हे देखील दुसऱ्या कंटेटच्या तुलनेत दुपटीने प्रेक्षकांपर्यंत पोचतात.इन्स्टाग्राम रील्सचा ऍव्हरेज रीच रेट (सरासरी पोहोचण्याचा दर) हा 30.81 टक्के आहे. तर कॅरोसल (अशी पोस्ट की त्यात एकापेक्षा अधिक फोटो आणि व्हिडिओ असून त्यात यूजर स्वाइप करून पाहू शकतो) तसेच फोटो पोस्टचा अव्हरेज रीच रेट हा अनुक्रमे 14.45 टक्के आणि 13.14 टक्के आहे. 2022 आणि 2023 यादरम्यान कॅरोसल पोस्टचा पोहोचण्याच्या दरात लक्षणीय घसरण झाली होती.
“स्टॅटिस्टा’च्या एका अहवालानुसार इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स असणाऱ्या यूजरचा अव्हरेज रीच रेट सर्वाधिक आहे. 500 फॉलोअर्सपर्यंत असणाऱ्या खातेधारकांचा सरासरी रीच रेट हा 892 टक्के आहे. सर्वाधिक फालोअर्स असणाऱ्या मंडळीपेक्षा हा रीच रेट अनेक पटीने अधिक दिसून येतो. अर्थात, सर्वाधिक रीच असणाऱ्या मंडळींकडून तयार होणाऱ्या रील्सच्या रीचमध्ये महत्त्वपूर्ण वाढ झालेली दिसून येते.
“डिमांड्स एज’ या संकेतस्थळानुसार 23.02 कोटी इन्स्टाग्राम यूजरसह भारत हा इन्स्टाग्राम रील्सची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दुसऱ्या क्रमाकांवर अमेरिका 15.97 कोटी आणि तिसऱ्या स्थानावर ब्राझील 11.94 कोटी आहे.
युट्यूबचा विचार केला तर व्हिडिओच्या जगात अजूनही बेताज बादशहा समजला जाणारा युट्यूब हे प्रेक्षकांच्या आवडीचे व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. “स्टॅटिस्टा’च्या मते, 2.9 अब्ज नागरिक फेसबुकचा वापर करतात तर 2.5 अब्ज लोक युट्यूब. यापैकी 8 कोटी यूजर तर युट्यूबचे प्रीमिअम ग्राहक आहेत. “स्प्राउट सोशल’च्या मते, एक मिनिटांपेक्षा कमी काळाच्या शॉर्ट व्हिडिओत 66 टक्के यूजरना आकर्षित करत आहेत. हे व्हिडिओ दीर्घकाळाच्या व्हिडिओच्या तुलनेत अडीच टक्के अधिक लोकप्रिय आहेत. 34 टक्के यूजर शॉर्ट व्हिडिओचे चाहते आहेत.
बदलणारा काळ
मोबाइलमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचे आगमन झाल्यानंतर आपले म्हणणे मांडण्यासाठी यूजरनी प्रथम टेक्स्ट आणि फोटोच्या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला. त्यानंतर व्हिडिओ आणि नंतर ऑडियो कंटेंटने धुमाकूळ घातला. आता शॉर्ट व्हिडिओच्या वाढत्या लोकप्रियतेने केवळ टेक्स्ट मेसेजच नाही तर फोटोच्या लोकप्रियतेला एकप्रकारे ओहोटी लागली.
त्यावरून शॉर्ट व्हिडिओ हे फोटोच्या तुलनेत अधिक लोकप्रिय ठरल्याचे दिसत आहे. यात गीत संगीत असते आणि कथानकही असते. अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करणे हे पूर्वीपेक्षा अधिक सोयीचे आणि सुलभ ठरले आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनमध्ये असंख्य प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग ऍप मोफत उपलब्ध आहेत.
रील्सने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असले तरी फोटोचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. आठवणी साठविण्यासाठी हा एक स्थायी मार्ग आहे. अनेक वर्षांपर्यंत ते सांभाळून ठेवता येतात आणि गॅलरीतही बाळगता येते. फोटो, छायाचित्र हे एकमेकांना जवळ आणण्याचे काम करते आणि व्यक्तिशः पातळीवर ते परस्परांना जोडतात. या गोष्टी व्हिडिओतून साध्य होत नाहीत.
एवढेच नाही तर बहुतांश मंडळी फोटोचा अल्बम तयार करतात आणि पुढच्या पिढीसाठी मोठी आठवण म्हणून बाळगतात. प्रवास, देवदर्शन, वाढदिवस, लग्नसमारंभ या आठवणींचा संग्रह करतात. एकंदरीत सध्या शॉर्ट व्हिडिओ लोकप्रिय साधन ठरत असले तरी ते पूर्णपणे छायाचित्रांना बाद करतील, असेही नाही.