देशाच्या सैन्यदलामध्ये लैंगिक समानता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जात आहे. भारतीय लष्कर लवकरच आपल्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करणार आहे.
लष्करात समानता मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठी आणि लैंगिक समानता सुनिश्चित करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तमाम लोकांसाठी ही सुवार्ता आहे. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात सुरुवातीच्या काळापासून लष्कर हे केवळ पुरुषांसाठीचे क्षेत्र मानले जाते. त्यामुळे साहजिकच महिलांना या क्षेत्रात प्रवेश करणे आणि पुढे जाण्यासाठी पावला पावलावर अडथळ्यांचा सामना करावा लागतो. लष्करांतर्गत असणारी पुरुषसत्ताक मानसिकता हेही यामागचे मोठे कारण आहे.
या सर्वच दृश्य आणि अदृश्य अडथळ्यांमुळेच 1990च्या सुरुवातीलाच 14 लाख संख्या असलेल्या सशस्त्र दलात प्रवेशाची दारे खुली होऊनही आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांची संख्या केवळ 3900 च्या आसपासच असल्याचे दिसून येते. यात 1710 महिला अधिकारी भूदलात, 1650 हवाई दलात आणि 600 नौसेनेत आहेत. याशिवाय 1670 महिला डॉक्टर, 190 डेंटिस्ट आणि 4750 नर्स अत्यावश्यक मिलिटरी मेडिकल स्ट्रीममध्ये आहेत.
मात्र, विशेष बाब अशी की, सैन्यात जी ड्युटी अवघड मानली जाते त्यावर महिला अधिकाऱ्यांना पाठविले जात नाही. हीच बाब महिला अधिकाऱ्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली आहे आणि याबाबत सतत आवाज उठवित आहेत. आजही महिला अधिकाऱ्यांना इन्फंट्रीच्या कॉम्बॅट आर्म्स, आर्मर्ड कोर (टॅंक) आणि मेकेनाइज्ड इन्फंट्रीमध्ये किंवा नौसेनेच्या पाणबुडीमध्ये ड्युटी दिली जात नाही. खरे तर महिला आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हळूहळू कठीण परिस्थितीतसुद्धा स्वतःला सिद्ध करून पुढे जात आहेत. सैन्याकडून सध्या उचलले जात असलेले पाऊल दोन कारणांमुळे खास आहे.
एक म्हणजे, आर्टिलरीला सैन्याचे “कॉम्बॅट सपोर्ट आर्म’ म्हटले जाते. चीन आणि पाकिस्तानच्या संवेदनशील सीमा क्षेत्रांवर ते तैनात युनिटसोबत फ्रंटलाइनवर असते. दुसरे म्हणजे सैन्याचा हा निर्णय सैन्याने स्वतःच घेतला आहे. यापूर्वी महिलांसंबंधित महत्त्वाचे निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच घेतले जात होते. तथापि, आताचा निर्णय हा सशस्त्र सैन्यदलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील महिलांच्या क्षमतांविषयीच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन घडवणारा आहे.
येत्या काळात सशस्त्र दलांमध्ये महिला अधिकारी अन्य पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच स्वतःला सिद्ध करू लागतील तेव्हा त्यांची भूमिका अधिकाधिक प्रभावी बनत जाईल.