460 पात्र संशोधक विद्यार्थ्यांचा “बार्टी’ प्रशासनाला इशारा
पुणे – छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (सारथी) अर्ज आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) प्राप्त अर्जापैकी 460 पात्र संशोधक विद्यार्थ्यांना येत्या 8 दिवसांत फेलोशिप मंजूर करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ संशोधक विद्यार्थी समितीने दिला आहे.
बार्टीतर्फे अनुसूचित जातीच्या एम.फिल. व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक संशोधन अधिछात्रवृत्ती, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती, ज्योतीराव फुले राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती आणि छत्रपती राजर्षी शाहू संशोधन अधिछात्रवृत्ती या नावाने फेलोशिप दिली जाते; परंतु बार्टी अगदी बोटावर मोजण्याएवढ्याच संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
बार्टीने आता वर्ष 2018 मध्ये फेलोशिपसाठी आलेल्या पात्र सर्वच 460 विद्यार्थ्यांना तत्काळ मंजूर करून एम.फिल व पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग यूजीसीप्रमाणे पाच वर्षे द्यावी. तसेच नेट व सेटची कुठलीही अन्य अट न टाकता वर्ष संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत बार्टीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.