पुणे -सहा महिन्यांपूर्वी म्हणजे 29 मार्च 2023 रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. तीन सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. या निमित्ताने त्यांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याचा उद्देशाने कुटुंबीयांनी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी त्यांच्या जयंतीदिनी केले.
जगन्मित्र असलेले बापट हे कट्टाप्रिय व्यक्तीमत्त्व होते. कट्ट्यामुळे मी अधिक प्रफुल्लीत राहतो, कट्टा हा माझा श्वास आहे, असे ते म्हणत असत. त्यांच्या या आवडीच्या गोष्टींनीच त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय पत्नी गिरीजा, मुलगा गौरव आणि स्नुषा स्वरदा यांनी घेतला आणि त्यांच्या मृत्यूनंतरची त्यांची पहिली जयंती “बापट कट्टा’ या नावाने साजरी केली. या “बापट कट्ट्या’वर बापटांना जवळून ओळखणारे, त्यांचे जवळचे मित्र, कट्टेकरी, स्वपक्षातील, अन्य पक्षातील असे सहकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील त्यांचे दोस्त, या सगळ्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
यानिमित्ताने बापटांच्या आवडीचा असलेला मटार उसळ स्लाइस, बटाटेवडा, ब्रेड पॅटीस, साबुदाणा खिचडी आणि वडा असा मेन्यू ठेवण्यात आला होता. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. काही किस्सेही अनेकांनी सांगितले. यामध्ये शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे, उल्हास आणि कमल ढोले-पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, गणेश बिडकर, जगदीश मुळीक, हेमंत रासने, बाळासाहेब दाभेकर, प्रवीण तरडे, भानुप्रताप बर्गे, बाळासाहेब शिवरकर, विद्याधर अनास्कर, सुहास कुलकर्णी, उल्हास पवार आदी यावेळी उपस्थित होते.
गप्पांचा कट्टा आणि विविध पदार्थ ही बाबांची अतिशय आवडती आणि जिव्हाळ्याची गोष्ट होती. दरवर्षी वाढदिवशी त्यांना भेटायला येणाऱ्यांची आणि त्या गप्पांची आम्हाला सवय होती. पण आता ते नाहीत. परंतु त्यांची ही आवड जपण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील पहिल्या रविवारी “बापटकट्टा’ करणार, असा संकल्प या निमित्ताने केला आहे. -गौरव बापट (गिरीश बापट यांचे चिरंजीव)