मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. हा सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या निर्णयानंतर अनेक मंत्री आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे.
अश्यातच आता सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या प्रकरणावर आपले मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “निवृत्तीचे काय संकेत दिले याबद्दलची माहिती नाही. आपल्याच माध्यमातून कळालं. राज्यसभेमध्ये तीन वर्षाचा कालावधी आहे राज्यसभेचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा राज्यसभा संसदीय कामकाजामध्ये सहभागी होणार नाही अशी स्पष्टता त्यांनी दिली’. असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते कधी निवृत होणार आहे याची मला माहिती नाही. पण राष्ट्रवादी पक्षाचा जो काही कारभार आहे. तो ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत्यांची एक समिती करून साधारणतः सोपायचा विचार करत आहेत. क्रिकेटमध्ये अतिशय उंचीवर गेल्यावर अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हाच भाव असतो..’ असं देखील सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
‘आम्ही लक्ष ठेवून आहोत.. योग्य वेळ आल्यावर बोलेन’ – देवेंद्र फडणवीस
यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘हा त्यांच्या पक्षातील निर्णय आहे. योग्य वेळी आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ. पण हा त्यांच्या वैयक्तीक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हा अंतर्गत विषय आहे. यावर अजून चर्चा सुरु आहे. याबाबत आम्हाला काहीही माहित नाही. आत्ता यावर बोलणं प्रीमॅच्युअर राहील. त्यामुळे मी यावर आत्ता बोलणार नाही. आम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत..’ योग्य वेळी आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले आहेत.