सातारा – सकल मराठा समाजाच्यावतीने राजधानी साताऱ्यात गांधी मैदानावर उद्या दि. 18 रोजी होणाऱ्या मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. समन्वयक समितीने पोलीस प्रशासनाचा हिरवा कंदिल मिळवत सभेची जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या टीकेला जरांगे पाटील काय उत्तर देणार हा औत्सुक्याचा विषय आहे.
सरकारने आरक्षण दिलं नाही तर खर्डा भाकरी घेऊन मंत्रालय पाहयला राज्यातला मराठा समाज येईल असा इशारा दिला जरांगे पाटील यांनी दिला आहे. सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना सर्वच राज्यकर्त्याना आणि भोकरदनमध्ये गावबंदीचा बॅनर फाडणाऱ्या तसेच मराठा समाजात दुही निर्माण करणाऱ्यांना जरांगे- पाटील यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितल्यामुळे राज्यभरात त्यांच्या सभांचे वादळ घोंगावत आहे. शहरात दि. 18 रोजी हे वादळ येत आहे. त्यांच्या सभेची शहरातील कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. सभेच्या परवानगीचे पत्र पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आले आहे. उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी गांधी मैदान परिसराची पाहणी केली.