काटेवाडी परिसरातून धनगर समाजबांधव उतरले रस्त्यावर
काटेवाडी – धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पालखी महामार्गावर दीड तास रस्ता रोको करण्यात आला. आरक्षण हे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे याबाबत धनगर समाजाची भूमिका मांडली. सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी चंद्रकांत वाघमोडे यांनी बारामती येथे उपोषण सुरू केले आहे. वाघमोडे यांच्या या उपोषणास सर्व धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात येऊन उपोषणामध्ये सर्व धनगर समाजाने सामील होण्याचे आवाहन केले.
आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी काटेवाडी, ढेकळवाडी, मासाळवाडी, खताळपट्टा, कण्हेरी, लिमटेक, पिंपळी तसेच परिसरातील सर्व समाजाने एकत्र येऊन काटेवाडी या ठिकाणी बारामती – इंदापूर रस्ता दीड तास अडवला.
आणखी उग्र आंदोलनाचा इशारा
यावेळी काटेवाडीपासून पिंपळीपर्यंत व काटेवाडीपासून सणसरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका घेतली. सरकारने धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तत्परता दाखवली नाही तर धनगर समाज यापुढे मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन छेडणार आहे याची दखल शासनाने घ्यावी.