फुलबाजारात “दिवाळी’ नाही
पुणे – अवकाळी पावसाचा उत्पादनावर झालेला परिणाम, दसऱ्याला मोठी आवक झाल्यानंतर अपेक्षित न मिळालेला भाव, या कारणांमुळे यंदा दिवाळीला मार्केट यार्डातील फुल बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत उलाढाल घटली. याचा सर्वाधिक फटका झेंडूला बसला.
मागील वर्षी 21 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत 2 कोटी 54 लाख 32 हजार 900 रुपयांची उलाढाल झाली होती. यामध्ये घट होऊन यंदा 9 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत 1 कोटी 44 लाख 31 हजार 640 रुपयांची उलाढाल झाली आहे. तर, मागील वर्षी शेवंतीची 1 कोटी 89 लाख 99 हजार 040 रुपयांची उलाढाल झाली होती. यामध्ये घट होऊन यंदा 1 कोटी 15 लाख 37 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.
पुणे विभागासह पावसाने यंदा सर्वत्र पाठ फिरविली आहे. त्यामुळे फुलांचे उत्पादन जास्त झाले आहे. यंदा नवरात्रोत्सव आणि दसऱ्या मोठी आवक झाली होती. त्यामुळे फुलांना कमी भाव मिळाला होता. फुले रस्त्यावर टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर दिवाळीतही फुलांची जास्त आवक होण्याचा अंदाज होता. मात्र, तो अंदाज फोल ठरला.
भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात माल बाजारात आणला. दिवाळीत तुलनेने आवक कमी झाली. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे झालेल्या आवकमध्ये खराब आणि दर्जाहिन मालाचे प्रमाण लक्षणीय होते. मात्र, नागरिकांकडून दर्जेदार मालाला मागणी होती. दोन्ही फुलांना मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी कमी भाव मिळाला.
दिवाळीत मार्केट यार्डात यंदा झेंडू, शेवंतीची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली. शहराच्या वाढलेल्या व्याप्तीमुळे फुलांना मागणी जास्त आहे. मात्र, दर्जेदार मालाला मागणी होती. दोन्ही फुलांना मागील वर्षीपेक्षा तुलनेत सरासरी भावही कमी मिळाला. याशिवाय शेतकऱ्यांना थेट फुले विक्री करण्याची मुभा बाजार समितीने दिली होती. तेथेही फुलांची मोठी विक्री झाली.
– बाळासाहेब कोंडे, फुल विभाग प्रमुख, बाजार समिती
9 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत झालेली आवक, मिळालेला भाव आणि उलाढाल.
(21 ते 26 ऑक्टोबर 2022 यामध्ये झालेली आवक आणि मिळालेले भाव, उलाढाल कंसात आहेत)