तेहरान – इराणमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले हिजाबविरोधी आंदोलन आणि माहसा आमिनी या युवतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले नैतिक पोलिसंच्या दलाचे विघटन करण्यात आले आहे. माहसा आमिनी या युवतीच्या मृत्यूला हे नैतिक पोलीस दलच कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
महिलांची वेशभुषा निकषांनुसार परिधान न केल्याबद्दल या नैतिक पोलिसांनी माहसा आमिनीला अटक केली होती. मात्र दोनच दिवसानी 18 सप्टेंबर रोजी पालिसांच्या कोठडीतच तिचा मृत्यू झाला होता. तेंव्हापासून इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सुरू झाले आहे.नैतिक पोलिसांना न्यायपालिकेशी काहीही कर्तव्य नाही. त्यामुळे हे नैतिक
पोलीस दल विसर्जित करण्यात आले आहे, असे ऍटर्नी जनरल मोहम्मद जाफर मोन्तझारी यांनी इराणमधील सरकारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तेहरानमधील एका धार्मिक परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
महिलांनी डोके झाकण्यासाठी खरोखर एखादा कायदा आवश्यक आहे का, याबाबत न्यायपालिका आणि संसद लवकरच विरार करणार आहे, असे मोन्तझारी दोनच दिवसांपूर्वी म्हणाले होते. इराणच्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीमध्ये काही बदल केले जाऊ शकतात, असे संकेत इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनीही दोन दिवसांपूर्वी टिव्हीवरून दिलेल्या संदेशात दिले होते.
नैतिक पोलीस दल म्हणजे काय –
इराणमध्ये नैतिक वर्तनाची अंमलबजावणी करण्यासाठी गाश्त ए इर्शद अर्थात नैतिक पोलीस दल कट्टरवादी अध्यक्ष मेहमूद अहमेदिजाद यांच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आले होते. नम्रता आणि हिजाबच्या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी हे दल नियुक्त करण्यात आले होते. या दलाने 2006 मध्ये देखरेखीच्या कामाला प्रारंभ केला. इराणमध्ये 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिकेच्या पाठिंब्यावरील राजेशाही उखडून फेकून देण्यात आली होती.
तेंव्हापासून महिलांनी हिजाब परिधान करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र तेंव्हा महिलांना अटक करण्यापूर्वी 15 दिवस आगोदर इशारा दिला जात असे. मात्र अलिकडच्या काळातील अध्यक्ष हसन रौहानी यांच्या कार्यकाळात हे नियम सैल झाले होते. तेंव्हा इराणमधील महिला चक्क जीन्स देखील घालू लागल्या होत्या. रौहानी यांच्या नंतर अध्यक्ष झालेल्या राईसी यांच्या कट्टरवादी स्वभावानुसार नैतिक पोलिसांचे कार्य देखील अधिक कठोर झाले.