पुणे – पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार दिलीप मोहिते, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पवार म्हणाले, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारणे आवश्यक आहे.
मावळ-खेड भागातील नागरिकांनी औद्योगिक क्षेत्रासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्राला जोडणारे रस्ते, पोहोच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मुख्य रस्ते बनवितानाच पर्यायी रस्त्यांची दुरूस्ती करावी, त्यांची रूंदी वाढवावी. शेतकऱ्यांची मान्यता असल्यास पुणे चक्राकार रोड (रिंग रोड) तयार करताना मरकळ ते गोलेगावदरम्यान सर्विस रोड ९० मीटरऐवजी ११० मीटर करावा. त्यापुढे तो लोणीकंदपर्यंत वाढविण्याबाबत विचार करावा. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास मान्यता देण्यात येईल.
पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्हावे
चाकण एमआयडीसीकडे ४२ एमएलडी पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतीला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होत असून ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्यामधून गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही पवार म्हणाले.