जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांत विविध पद्धतीने आंदोलन
मंचर – संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या कामगार व शेतकर्यांच्या महापाडाव म्हणजे धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व राज्य सरकारने शेतकर्यांच्या प्रश्नांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यात मंगळवारी (दि. 28) विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आले. अशी माहिती किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी मंचर येथे दिली.
संबंध राज्यभरात व पुणे जिल्ह्यात दुधाचे भाव अत्यंत कमी झालेले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात आलेला आहे. राज्य शासनाने 34 रुपये हा हमीदर जाहीर करून ही, दूध उत्पादक शेतकर्याला मात्र आज 26 ते 27 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे राज्यशासनाने त्वरित हस्तक्षेप करून दूध संघ व खासगी कंपन्यांना किमान 34 रुपये दर देणे जे अगोदरच बंधनकारक केले आहे, त्या निर्णयाची सक्तपणाने अंमलबजावणी करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. अशी मागणी करत, पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील विविध गावांत शेतकरी रस्त्यावर उतरून त्यांनी दूध दरवाढीच्या मुद्द्यावर अकोला येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देऊन दुधाचे दर त्वरित वाढवावेत अशी मागणी केली.
खेड तालुका तहसीलदार प्रशांत बेडसे, जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना प्रत्यक्ष भेटून तर आंबेगाव व शिरूर तालुक्यात तहसील कार्यालय येथे जाऊन किसान सभेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात, गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्यांचे जे नुकसान झाले आहे त्याचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई अदा करावे अशी मागणी करण्यात आली. याबरोबरच रोजगार हमीची कामे सुरू व्हावीत, हिरड्याची नुकसान भरपाई मिळावी, आदिवासी पेसा भागात, शिक्षकांची नियुक्ती त्वरित करावी, यासारख्या अनेक स्थानिक मागण्या यावेळी निवेदनाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार यांना करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व, किसान सभेचे जिल्हा डॉ. अमोल वाघमारे, महेंद्र थोरात, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, संतोष कांबळे, किसनराव ठाकूर, अमोद गरुड, निलेश भुजबळ, राजू घोडे, कोंडीभाऊ बांबळे, बाळू काठे इत्यादींनी केले होते.
शासन निर्णयाची होळी
34 रुपये दुधाला हमीदर देण्याचे घोषित केलेला, शासन निर्णयही काही ठिकाणी शेतकरी बांधवांनी एकत्रित येत, जाळला गेला. मागील सहा दिवसांपासून राज्यभरामध्ये विविध ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. यामध्ये किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले हे ही उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाला पाठिंबा देत, या उपोषणाची राज्यशासनाने, अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन उपोषणकर्ते यांच्याशी संवाद साधून दुधाला जाहीर केलेला हमीभाव कसा मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.