मुंबई – ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गदर 2, जेलर या चित्रपटांना सुभेदार चित्रपट तगडी टक्कर देत आहे. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची कथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली होती. त्यांच्या या दोन्ही ऐतिहासिक भूमिकांचे कौतुक झाले आहे. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता अजय पूरकर दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार आहेत.
अजय पूरकर साकारत असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचे नाव ‘स्कंदा’ असे आहे. दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी या चित्रपटातील कलाकारांची ओळख करून देताना अजय पूरकर यांचे विशेष कौतुक केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी सुभेदार चित्रपटातील अजय यांच्या भूमिकेचा उल्लेख करत विशेष कौतुक केले.
यावेळी बोयापती श्रीनू म्हणाले की, “हे अजय पूरकर आहेत. मराठी रंगभूमीवरील एक उत्कृष्ट कलाकार. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तान्हाजी मालुसरे यांच्या व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. त्यांनी आपल्या ‘स्कंदा’ चित्रपटातही चांगला अभिनय केला आहे. त्या भूमिकेबद्दल आता मी काही सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. त्यांचा सुभेदार हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.”
दरम्यान, ‘स्कंदा’ हा चित्रपट येत्या 15 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी याभाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.