शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्ती नसेल – राज्यमंत्री तनपुरे

मुंबई : राज्यातील शाळा उद्यापासून सुरू होत आहे. करोना वाढण्याच्या भीतीने काही शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, यावरून संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती देत “शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच सक्ती नसेल, विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात,” असं स्पष्ट केले आहे.

राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्यापासून शाळा सुरू होत असून, शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी याविषयी सविस्तर माहिती दिली. “सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितलेले आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सचिवांशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल,” अशी माहिती तनपुरे यांनी दिली.

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच दुसरीकडे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी काढले आहेत. त्याचबरोबर ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यांची माहिती दिली. १३ डिसेंबरला करोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरु होणार आहेत. मात्र महापालिका क्षेत्रातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी याची माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.