पुणे जिल्हा: काझडची दारूविक्री करणारी टोळी तडीपार

वालचंदनगर पोलिसांची कारवाई

वालचंदनगर/ भवानीनगर  -वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काझड येथे दारू विक्री करणाऱ्या टोळीला तडीपार करण्यात आले. ही कारवाई वालचंदनगर पोलिसांनी केली आहे.

ललिता कांतीलाल भारती (वय 55), प्रदीप कांतीलाल भारती (वय 28), संदीप कांतीलाल भारती (वय 32), सोनल संदीप भारती (वय 25), कांतीलाल बाळू भारती (वय 62, सर्व रा. काझड, ता. इंदापूर), असे तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

काझड येथे या टोळीने दहशत निर्माण करीत बेकायदेशीर दारु विक्री, गुटखा विक्रीचा व्यवसाय, विनयभंग, चोरुन दारु विक्री आदी गुन्हे वालचंदनगर हद्दीत केलेले आहेत.

वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यामार्फत या टोळीला तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर केला. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हा प्रस्ताव तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल, आदींचे अवलोकन केले.

यानंतर डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, पुरदंर या तालुक्‍यांत 3 महिन्यांकरिता हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.