पुणे जिल्हा: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाची मांड पक्‍की

हवेली तालुक्‍यात स्थानिक नेत्यांची तालुका, जिल्हा संघटनेत वर्णी : राष्ट्रवादीचा घोर वाढला

दत्तात्रय गायकवाड
वाघोली – लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने हवेली तालुक्‍यातील 38 गावांत आपले वर्चस्व सिद्ध करत मतांची आघाडी मिळवली होती. लोकसभेचे उमेदवार तसेच विधानसभेचे उमेदवार राष्ट्रवादीचे असतानादेखील हवेलीच्या मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा भाजपने गावपातळीपर्यंत नेटवर्क मजबूत केल्यामुळे हवेली तालुक्‍यात ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी मांड पक्‍की करण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपाने तालुक्‍यात नुकत्याच अनेक गावांतील आजी-माजी पदाधिकारी यांना तालुका, जिल्हा पक्षसंघटनेत स्थान देऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, ही पक्ष संघटना दोन महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रभावी ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील राज्यातील पंधराशे 66 ग्रामपंचायत निवडणुका येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये होणार आहेत. या दोन महिन्यांत पैकी निवडणुकीची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून ते 10 डिसेंबरच्या कालावधीमध्ये सुरू होत आहे. स्थानिक पातळीवरच्या प्रशासनाची परवानगी घेऊन ज्यात या जिल्ह्यांमध्ये या निवडणुकीचे कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या प्रारुप मतदार यादी अंतिम मतदार यादी या स्वरूपातील कामे करण्यासाठी ग्रामपंचायती स्तरावर प्रशासनाने कंबर कसली आहे. हवेली तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळखला जातो.

या बालेकिल्ल्‌यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आहे. हे नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकामधून दिसून आले आहे. मात्र, आत्ता हवेली तालुका भाजपने आपली तालुक्‍याची पकड मजबूत करण्यासाठी जुन्या नव्यांना संधी देत पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. येत्या दोन महिन्यांवर होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटनेचा फायदा पक्षाला होईल, असा विश्‍वास भाजपच्या गोटातून व्यक्‍त केला जात आहे.

शेतजमिनींना लाखमोलाचा बाजारभाव मिळत असल्याने लोकांचे राहणीमान बदलले आहे. त्यामुळे कमी लोकसंख्या असलेले ग्रामपंचायतीची आत्ताची लोकसंख्या आणि प्रत्यक्ष मतदारसंख्या दिवसेंदिवस वाढू लागले आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी आपली वर्णी लागावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच केली आहे. पक्षसंघटना तसेच इतर सामाजिक संघटनावरील पदांना हवेली तालुक्‍यात महत्त्व प्राप्त झाले आहे.

गावोगावी प्रभाव
पक्ष संघटनेमध्ये भाजपने जुन्यांची पुन्हा वर्णी लावली आहे तर नव्यांना पदोन्नती देऊन भाजपने आपले वेगळेपण टिकवले आहे. वेगवेगळी आंदोलने करून सामाजिक प्रश्‍नांची हाताळणी करून भाजप आपले वेगळेपण तालुक्‍यात केंद्रात आणि राज्यात भाजपचा प्रभाव पाहता खेडोपाडी हा प्रभाव दिसण्यास आता सुरूवात झाली आहे.

भाजपचे तत्कालीन अध्यक्ष गणेश कुटे यांच्या कार्यकाळापासून भाजपमध्ये अनेक आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समिती तसेच सेवा सहकारी संस्था विविध सामाजिक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून वातावरण भाजपमय केले होते.

पक्षसंघटना मजबुतीवर भर
हवेली तालुक्‍याच्या पक्ष संघटनेमध्ये रोहिदास उंद्रे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनीदेखील पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देऊन त्यांच्या काळात देखील पक्षात प्रवेश करण्याची संख्या वाढली होती. आता सुनील कांचन हे तालुक्‍याचे अध्यक्ष असल्याने त्यांनी देखील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणारे अनेक तरूण कार्यकर्ते यांना संधी देऊन पक्ष संघटना वाढीस नेण्याची कार्य सुरू ठेवले आहे.

त्यामुळे तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना तवेच भाजप यांचे वेगळेपण दिसून दिसून येऊ लागले आहे. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर पक्ष संघटनांचा प्रभाव दिसून येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी ही उल्लेखनीय असल्याचे बोलले जात आहे, याचा किती प्रभाव आगामी निवडणुकांवर होतोय हे काळच सांगू शकेल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.