पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल येत्या 20 जुलै दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तंत्रशिक्षणच्या पदविका, पदवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होतील. प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षणाचा सर्व लाभ घेता येणार नाही. त्यासाठी आतापासून प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयच्या अखत्यारित दहावी व बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदविका व पदवी अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, एमई अथवा एमटेक, एमसीए, एमबीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविली जाते. त्यासाठी अर्ज करताना सुविधा केंद्रावर कागदपत्रे पडताळणीच्या वेळी प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या आवश्यक ती कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी आतापासून सुरुवात करावी, असेही तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमीलेअर आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सैन्य दलातील अथवा अल्पसंख्याक या संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे असणे महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास खुल्या संवर्गातून प्रवेश निश्चिती केली जाते. त्यामुळे आरक्षणाची कोणतेही लाभ घेता येणार नाही, असेही तंत्रशिक्षण संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –
- जात प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र .
- आधार क्रमांक, बॅंक खाते