अर्धशतकाचा टप्पा ओलांडला,बारामतीकरांची चिंता वाढली
बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहरात आज सकाळी आढळून आलेल्या ९ कोरोना बाधितांच्या संपर्कातील आणखी ९ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शहरात दिवसभरात रुग्णांची संख्या १८ एवढी झाली आहे. बारामतीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५८ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
आज सकाळी सापडलेल्या ९ कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील २५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील सहा जणांना व इतर नवीन ३ व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे शहरात व तालुक्यात कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक ठरत असून बारामतीकरांची व प्रशासनाची चिंता वाढली आहे.