पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले.
राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दि. २६ फेब्रुवारीच्या तरतुदीनुसार दि.२६ फेब्रुवारी पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आले असून निवड प्रक्रिया सुरू झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता दि. २९ डिसेंबर, २०२३ मध्ये विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा दि.२८ एप्रिल, २०२४ला घेण्यात येणार होती.
परंतु, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दि.२६ फेब्रुवारीला अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या दि. २१ मार्चच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच दि. १९ मे २०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही.
या परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता पुरेसा कालावधी देऊन तसेच संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोग इत्यादींमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेचे दिनांक विचारात घेऊन परिक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.