एसटीच्या चुकीच्या वेळेने विद्यार्थ्यांची पायपीट

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटीच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

टाकवे बुद्रुक – शाळा सुटण्याच्या वेळेवर बस येत नसल्यामुळे आंदर मावळातील माळेगाव खुर्द शाळेतील पिंपरी तळपेवाडी येथील विद्यार्थ्यांची दररोज सात किलोमीटरची पायपीट करीत घर गाठावे लागत असून त्यामुळे ही बस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दुपारी दोन ऐवजी तीन वाजता सोडावी अशी मागणी पालकांमधून होत आहे.

माळेगाव खूर्द येथील वरसूबाई माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये परिसरातील गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी एकच एस.टी बसची सोय आहे. मात्र, ही बस विद्यार्थ्यांच्या सोयीनूसार सुटत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे सात किलोमीटरची पायपीट करीत घरी पोहचावे लागत आहे.

तळेगाव आगारातून सुटणारी एसटी बस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दुपारी दोन ऐवजी तीन वाजाता सोडली माळेगाव खूर्द येथील शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या पिंपरी तळपेवाडी,माळेगाव बुद्रुक, सावळा येथील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर वेळेवर घरी जाता येईल शिवाय याच मार्गावरील भोयरे,इंगळूण येथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे या बसच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा अशी मागणी विद्यार्थी व पालकामधून होत आहे.

अवेळी येणाऱ्या एसटी बस मुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते ही वस्तुस्थिती आहे. कधी कधी ही मुले खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीपने घरी जातात.
– राजेश गायकवाड, मुख्यध्यापक


वेळेवर एसटी यावी यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील होते पण तरीही बस वेळेवर येत नाही. भोयरे ते माळेगाव या मार्गावर भोयरे,इंगळूण आणि माळेगाव खुर्द येथे तीन माध्यमिक विद्यालये आहे. या सर्व
शाळेंचा समन्वय साधून वेळेवर एसटी यावी अशी आमची मागणी आहे.
– शंकरराव सुपे, माजी सभापती

Leave A Reply

Your email address will not be published.