‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा

“रॉंग साईड’ने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करूनही मानसिकता “जैसे थे’

– कल्याणी फडके

पुणे – वारंवार वाहतूक नियमांबाबत प्रबोधन आणि कारवाई करूनदेखील बेशिस्त वाहनचालकांची मानसिकता “जैसे थे’च असल्याचे चित्र शहरात आहे. वेळ वाचविण्यासाठी अनेक वाहनचालक “शॉर्टकट’चा अवलंब करतात. मात्र, तोच “शॉर्टकट’ जीवावर बेतत असल्याने वाहतूक विभागाकडून भारतीय दंड विधानानुसार कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहनांच्या संख्येच्या तुलनेने “बेशिस्त’ वाहनचालकांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे विनाहेल्मेट, झेब्रा क्रॉसिंग न थांबणे आदी कारवायांच्या बरोबरीने “रॉंग साईड’ने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक विभागाने भा.द.वि 279 नुसार जानेवारी ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत 1,903 बेशिस्तांवर कारवाई केली. यामध्ये चतु:शृंगी विभागामध्ये तब्बल 220 जणांवर कारवाई केली आहे.

वाहतुकीच्या विरूद्ध दिशेने बेदारकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात होतात. इतकेच नव्हे, तर योग्य दिशेने येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ होऊन, त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्‍यता अधिक असते. प्रामुख्याने तरूण मुले “शॉर्टकट’साठी आपला जीव धोक्‍यात घालत वाहन चालवत असल्याचे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे. या “शॉर्टकट’मुळे अनेकांना अपघातादरम्यान आपला जीव गमवावा लागतो. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होणारी ठिकाणे निश्‍चित केली आहेत. यामध्ये 24 वाहतूक विभागांतील 62 ठिकाणांचा समावेश आहे. त्यापैकी वारजे येथे प्रामुख्याने 7 ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अधिक आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या सन 2018 मध्ये झालेल्या अपघातांच्या आकडेवारीनुसार, भारतात 24 हजार 781 अपघात विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यामुळे घडले होते. त्यापैकी 8 हजार 764 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 24 हजार 100 जण जखमी झाले होते. तर महाराष्ट्रामध्ये या अहवालानुसार विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याने 1 हजार 84 अपघात झाले होते. त्यामध्ये 384 जणांचा मृत्यू झाला असून, 924 जण जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.