मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांची दौड

सातारा – जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने “रन फॉर व्होट’ अभियानाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, हा संदेश घेऊन सातारा शहरात दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दौड केली.

या मॅरेथॉनला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवला. अप्पर जिल्हाधिकारी आर. एस. शिंदे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर उपस्थित होते. तालीम संघाच्या मैदानावरून सकाळी साडेआठ वाजता मॅरेथॉनला सुरवात झाली.

तालीम संघ, कमानी हौद, शेटे चौक पोलीस मुख्यालयाकडून पुन्हा तालीम संघ मैदान, अशी दौड झाली. “कामाआधी मतदान करा’, “सुट्टी नाही, कर्तव्य पार पाडा’ असे संदेश लिहिलेल्या जर्सी विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या. त्यांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाला शाळांनी चांगला प्रतिसाद दिला. “स्वीप कार्यक्रमांर्तगत “रन फॉर व्होट’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्‍वेता सिंघल यांनी दिली. मतदारांनी सुट्टीचा दिवस म्हणून गप्प न बसता मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. काही अडचण आल्यास 1509 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सिंघल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.