पुण्याहून विमानांचा खोळंबा, तब्बल 20 उड्डाणे उशिराने

प्रवाशांचा सोशल मीडियावर संताप : नेते मंडळींमुळे उशीर झाल्याचा पवित्रा


10 विमानांना तासाहून अधिक उशीर

पुणे – लोहगाव विमानतळाहून देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारी 20 विमाने शुक्रवारी विलंबाने उडाली. त्यापैकी 10 विमानांना तासाहून अधिक उशीर झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊन, त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांनी खासगी विमानाने आणि हेलिकॉप्टरने ये-जा सुरू होती. त्यामुळे नागरी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे प्रवाशांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तर, प्रशासनाने याबद्दल अधिकृत कारण दिलेले नाही.

एअर एशियाचे पुणे-बेंगळुरू विमान (1427) नियोजित वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी उडून 8 वाजून 55 मिनिटांनी बंगळुरूला पोहोचते. शुक्रवारी हे विमान रात्री सव्वादहाला उडाले. ते मध्यरात्री पावणेबाराला बंगळुरूला पोहोचले. या विमानाला सुमारे तीन तास विलंब झाला.

एअर एशियाच्याच जयपूरला जाणाऱ्या विमानाला अडीच तासांचा विलंब झाला. हे विमान दुपारी 2 वाजून 55 मिनिटांऐवजी सायंकाळी 5 वाजून 52 मिनिटांनी उडाले. ते साडेसात वाजता जयपूरला पोहोचले. यासह पुणे-चंडीगड विमानाला पावणेतीन तास विलंब झाला. तर, पुणे-अहमदाबाद (6ई-135) विमानाला 44 मिनिटे, पुणे-चेन्नई विमानाला (6ई-302) दीड तास, पुणे-दिल्ली विमानाला (6ई-148) एक तास, पुणे-कोलकाता विमानाला (एसजी-275) एक तास, पुणे-गोवा विमानाला (एआय-9561) दीड तास विलंब झाला. यासह दिवसभरात अनेक विमानांना 15 ते 30 मिनिटांचा विलंब झाला.

दरम्यान, प्रवाशांनी सांगितल्यानुसार, “एअर एशियाचे बेंगळुरूहून पुण्याला येणारे विमान (आय-1426) अडीच तास विलंबाने पुण्यात आले. मात्र, त्यापूर्वी हे विमान पुण्याकडे येत असताना हैदराबादला उतरवण्यात आले. इंधनाचा तुटवडा भासल्याने विमान हैदराबादला वळवण्यात येत असल्याची घोषणा विमानात करण्यात आली होती. या प्रकारमुळे प्रवाशांची गैरसोय झाली.’

Leave A Reply

Your email address will not be published.