विद्यार्थी झालेत नफेखोरीचे माध्यम


काही इंग्रजी शाळांकडून पालकांची लूट  ; गणवेश, साहित्याच्या नावाखाली मनमानी
महादेव वाघमारे

“त्या’ शाळांची चौकशी करा!
मावळात केरळ राज्यातील अल्पसंख्याक संस्थांच्या शाळा केंद्रीय बोर्डाच्या नावावर शाळा सुरु करुन आर्थिक कमाईवर भर देत आहेत. काही शाळांना क्रीडांगण व वर्ग खोल्या नाहीत तरीही आमची गुणवत्ता या नावावर पालकांची लूट सुरु आहे. मावळ तालुक्‍यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून शिक्षणाच्या नावावर होणारी लूट थांबवून दर्जेदार शिक्षण द्यावे. तसेच शिक्षणाच्या नावाखाली रोख रक्कम जमा करणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक व पालक संघटनेने केली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना याबाबत निवेदन दिले आहे. मावळातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सुरु केलेले बाजारीकरण थांबविले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


वडगाव मावळ  – मावळ तालुक्‍यातील बहुसंख्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून शैक्षणिक शुल्क, गणवेश, साहित्याच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे.
मावळ तालुक्‍यात सोमटणे, तळेगाव दाभाडे, वडगाव, आंबी, नायगाव, कामशेत, खामशेत, लोणावळा व खंडाळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. इंग्रजी शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी पालकांकडून रोख हजारो रुपये देणगी घेतली जाते. शाळा नफेखोरीसाठी विद्यार्थ्यांना वर्गानुसार लागणारे शैक्षणिक साहित्य कमी किंमतीत खरेदी करते तेच शैक्षणिक साहित्य मनमानी वाढीव किंमतीला विक्री केली जाते. हे साहित्य घेण्यासाठी शाळेकडून सक्ती केली जाते. त्यात नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरमसाठ वाढविले जात असून ते पालकांकडून वसूल केले जात आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही.

प्रत्येक शाळा गणवेशात बदल करुन त्यांच्याच दुकानदारांकडून गणवेश खरेदी करण्याची सक्ती करतात. हे दुकानदार विद्यार्थ्यांच्या पालकांना वाढीव किंमतीत गणवेश विकतात कारण गणवेश खरेदीमागे दुकानदार शाळांना रक्कम देतात. विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत येण्या व जाण्यासाठी खासगी वाहनांची शाळाच व्यवस्था करते. त्यात ती वाहने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वर्षाकाठी हजारो रुपये वसूल करतात. त्या वाहनांवरील चालक वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवतात. त्यात काही वाहनांची मुद्दत संपलेली असताना ती वाहने सर्रासपणे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरली जात आहे. त्यातच शैक्षणिक सहलीच्या नावावर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वेगळी “फी’ जमा केली जाते. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली पैसे उकळूनही शिक्षक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची व अभ्यासाची भीती दाखवितात. पुन्हा शिकवणीचा नावाखाली हजारो रुपये उकळण्याचे प्रकार सुरु आहेत.

काही पालकांनी मोठया उत्साहाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊनही मुलांची प्रगती शून्य असल्याने मुलांना मराठी माध्यमाच्या तसेच सेमी इंग्रजी शाळेत प्रवेश देत आहे. मावळ तालुक्‍यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 टक्के जागा असतात. त्या विद्यार्थ्यांना अनेक शाळा प्रवेश देत नाहीत. या शाळांवर कोणाचाही अंकुश राहिला नसून विद्यार्थी व पालकांच्या तक्रारीला शाळा दाद देत नाहीत. शाळा शैक्षणिक शुल्क वाढीबाबत पालकांची बैठक घेत नाहीत. त्यात शिक्षकांना मिळणार पगार अत्यल्प असल्याने अनेक शिक्षकांना खासगी शिकवण्या घ्याव्या लागतात. विद्यार्थ्यांना संगणक, पोहणे, कराटे, घोडेस्वारी, नृत्य आदींच्या नावाखाली वेगळी फी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली गणवेश घेण्यासाठी पैसे गोळा केले जातात. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त गुण दिले जातात.


इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पालक सभा घेऊनच शैक्षणिक शुल्क निश्चित करावे. ज्या शाळा देणग्या घेत आहेत त्या शाळांची तक्रार करावी. अल्पसंख्याक शाळांनी 50 टक्के जागा त्यांच्या घटकांसाठी ठेवून इतरांना प्रवेश देण्याची तरतूद आहेत. मावळ तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 10 टक्के शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या आहेत. पालकांनी शाळांच्या मनमानी बद्दल गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी.

– मंगल वाव्हळ, गटशिक्षण अधिकारी, मावळ पंचायत समिती. 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.