मुंबई – अमेरिकेच्या पतधोरणात व्याज दरवाढीचे संकेत मिळाल्यानंतर कालपासून जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वारे वाहू लागले आहेत. आजही जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. भारतीय शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या मोठ्या लाटा आल्या. मात्र शेअर निर्देशांक खालच्या पातळीवर स्थिरावले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 21 अंकांनी वाढून 52,344 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ आठ अंकांनी कमी होऊन 15,683 अंकांवर बंद झाला.
औषधे आणि ग्राहक वस्तू क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यामध्ये धातु, सरकारी बॅंका, रिऍलिटी क्षेत्राचा समावेश होता. गेल्या काही दिवसांमध्ये मिड कॅपमधील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांक उंचावले होते. मात्र आज या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि निर्देशांक कमी पातळीवर गेले.
निर्देशांक उच्चांकी पातळीवर असताना जागतिक वातावरण नकारात्मक होत आहे. त्यामुळे भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांना निर्णय घेणे अवघड जात आहे. अशा परिस्थितीमध्ये खरेदी-विक्रीच्या मोठ्या लाटा निर्माण होत आहेत. त्यामुळे आगामी काही काळ तरी गुंतवणूकदारांना सावध राहून व्यवहार करावे लागणार असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
अमेरिकेच्या पतधोरणाचा परिणाम होऊन युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील शेअर बाजाराचा निर्देशांक पिछाडीवर राहिले. अशा परिस्थितीतही भारतीय निर्देशांक स्थिर राहिले आहेत. भारताच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे भारतातील बहुतांश भागातील लॉक डाउन उघडण्यात आले आहे.
त्याचबरोबर करोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकार विविध उद्योगांना आणि नागरिकांना काही सवलती जाहीर करण्याची शक्यता आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येते.