खेड-शिवापूर, (वार्ताहर) – खेड शिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील पी.आय.व्ही.मिशन मराठी मुलींच्या शाळेत इयत्ता चौथीच्या मुलांनी ‘आनंदबाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला. या उपक्रमात मुलांनी ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू तसेच विविध प्रकारच्या डाळी, फळे, भाजीपाला, फळभाज्या, पालेभाज्या व विविध खाद्यपदार्थ, दुधाचे पदार्थ व स्टेशनरी सामान या बाजारात उपलब्ध करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उद्घाटन शाखा व्यवस्थापक नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
निसर्गाच्या सान्निध्यात झाडांच्या सावलीत मोठ्या आनंदाने वस्तूंची खरेदी-विक्री करताना प्लॅस्टिक पिशव्याच्या ऐवजी कापडी पिशव्यांचाच वापर करा असं कटाक्षाने सांगत पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश मुलांनी प्रत्यक्षात आपल्या कृतीतून दाखवून दिला. उपक्रमातून मुलांना पैशाचे व्यवहार कळाले. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. खरेदी-विक्रीचा आनंद घेता आला.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन इयत्ता-चौथीच्या वर्गशिक्षिका वर्षा संजय पवार आणि दानियल मोग्या गावीत यांनी अतिशय सुंदर व नियोजनबद्ध केल्याचे दिसून आले. मिशन शाळेचे शाखा व्यवस्थापक इझाक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हवेली तालुक्याचे केंद्रप्रमुख हनुमंत जाधव यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हा उपक्रम राबवू शकलो, अशी माहिती वर्षा संजय पवार यांनी दिली. तसेच मुख्याध्यापिका सुचित्रा गायकवाड आणि सर्व सहकारी शिक्षकवर्ग यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याचे त्या म्हणाल्या.