नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज तिथीनुसार नगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. “जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात सायंकाळी नगर शहरात शिवसेना व भाजपच्या वतीने स्वतंत्र मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदा दोन्ही पक्षात शिवजयंतीच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी डिजेला परवानगी दिली नसतांनाही डिजे वाजविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, पोवाडा, तसेच भगवे झेंडे व पताकांनी अवघे नगर शहर भगवेमय झाले होते. चौका-चौकात मंडप उभारण्यात आले होते. नगर शहरासह केडगाव, सावेडी, नागापूर, बोल्हेगाव, भिंगार आदी ठिकाणी शिवप्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. शहरातील कापडबाजार, चितळेरोड, दिल्लीगेट, माळीवाडा, आशा टॉकीज चौक, सर्जेपुरा, तोफखाना, सावेडी. उपनगरातील प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग चौक, श्रीराम चौक, एकवीरा चौक, केडगाव, बोल्हेगाव, भिंगार, एमआयडीसी, बालिकाश्रम रस्ता परिसर आदी भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान, शिवसेनेतर्फे सायंकाळी साडेचार वाजता माळीवाडा बसस्थानक परिसरातील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पुष्पहार घालून मिरवणूकीला प्रारंभ झाला. त्यावेळी शहराध्यक्ष संभाजी कदम, युवासेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी नगरसेवक सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराज व श्रीरामाची भव्य मूर्ती, सनई-चौघडा, तुतारीवाले, घोडे, मावळे, पुणे येथील बॅन्जो पथक, सुपा येथील नाचणारे घोडे, अकलूज येथील हलगी पथक, अंबड येथील बॅण्ड पथक, वैजापूर येथी चाऊस बॅण्ड, राहुरी येथील ढोल पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच चार डिजे लावण्यात आले होते.
त्यानंतर भाजपची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, गिताजंली काळे, कालिंदी केसकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, मावळ्यांच्या वेशभूशेतील घोडेस्वार, पारंपारिक पोषाख, काठी पथक, आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात 1 पोलीस उपअधीक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 18 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी, 51 होमगार्ड, एसआरपीएफच्या 2 तुकड्या असा बंदोबस्त होता.