राज्यात खरिपाची जोरदार तयारी

कृषिमंत्र्यांकडून आढावा; 17 लाख 27 हजार क्विंटल बियाणे

पुणे – राज्यात खरीप हंगामासाठी सुमारे 16 लाख बियाण्यांची आवश्‍यकता असून सध्या 17 लाख 27 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे 40 लाख हेक्‍टर क्षेत्र अपेक्षित असून त्यासाठी 11 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. तर कापसाची लागवड 41 लाख हेक्‍टर क्षेत्रावर अपेक्षित आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण केली आहे. विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये खरिपाशी निगडित कामे सुरळीत होतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा कृषिमंत्री भुसे यांनी घेतला. यावेळी विभागाचे सचिव एकनाथ डवले, सहसचिव गणेश पाटील उपस्थित होते. या बैठकीतून कृषिमंत्र्यांनी कृषी आयुक्त, संचालक, सहसंचालक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात खरिपाचे 140 लाख हेक्‍टर क्षेत्र असून बियाणे बदलानुसार 16 लाख 15 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्‍यकता असून महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी उत्पादक यांच्या माध्यमातून 17 लाख 27 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

राज्यात तृणधान्य लागवड 36 लाख 2 हजार हेक्‍टर क्षेत्रावर तर कडधान्य लागवड 20 लाख 25 हजार हेक्‍टर क्षेत्रावर करण्याचे नियोजन असून 42 लाख 2 हजार हेक्‍टर क्षेत्रांवर तेलबिया लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. कापसासाठी 1 कोटी 70 लाख बियाण्यांच्या पाकिटांची आवश्‍यकता असून कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी 2 कोटी 72 लाख पाकिटाच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे.

खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी अवजारे विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्ण वेळ उघडी राहतील तसेच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतमजुरांना कामासाठी ये-जा करणे सहजसुलभ व्हावे तसेच शेतीविषयक व्यवसायातील व्यक्ती आणि संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कृषी विभागाने दिलेली प्रवेश पत्रे ये-जा करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावीत, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात दुप्पट क्षेत्रावर पेरणी…
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात दोन लाख 30 हजार 937 हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. यात भात पिकाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार 109 हेक्‍टरने वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी एक लाख 84 हजार 36 हेक्‍टरवर खरीप पेरणी झाली होती. यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिलपासूनच खरिपाची तयारी सुरू केली आहे. भात पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेती मशागतीची कामे हाती घेतली आहे. काही शेतकऱ्यांनी भाताच्या बियाण्याची उगवणक्षमता तपासून पाहण्याचे काम हाती घेतले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.